दूर देशी गेला बाबा,
गेली कामावर आई,
नीज दाटली डोळ्यांत,
तरी घरी कोणी नाही....
संदीप खरे यांनी
लिहिलेल्या या ओळी, आजच्या परिस्थितीची जाणीव करून देत आहेत. आजच्या युगात आई-बाबा आपल्या कामात इतके व्यस्त
असतात की त्यांना आपल्या पाल्याची विचारपूस करायला, त्याची काळजी घ्यायला, त्याचे
लाड पुरवायला, त्याच्यासोबत खेळायला, त्याचा अभ्यास घ्यायला वेळच मिळत नाही. कोणाचे
बाबा बाहेरगावी कामानिमित्त गेलेले असतात, तर कोणाची आई दिवसभर कामात मग्न असते
त्यामुळे त्यांना आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला शक्य होत नाही. मुलाच्या मनात काय चालल आहे, त्यांना काय
पाहिजे आहे, त्यांना नक्की कशाची गरज आहे याबद्दल आई-वडीलांना जाणून घ्यायला जमत
नाही. तसा विचारच त्यांच्या मनात येत
नाही. आपले मूल आनंदातच असेल, त्याला
आम्ही जे देत आहोत त्यात ते सुखी असेल अशीच समजूत पालकांच्या मनात असते. पूर्वी एकत्रित कुटुंबपध्दत असल्यामुळे लहान
मुलांना सांभाळायला कोणी न कोणी घरात असायचच.
परंतु, आजच्या काळात स्वतंत्र कुटुंबपध्दत असल्यामुळे आई-बाबांना पाळणाघर
किंवा केयर टेकर सारख्या पर्यायांचा आधार घ्यावा लागतो.
मुले म्हणजे देवाघरची फुले असे म्हणतात. लहान मुले म्हणजे
देवाचे रूप! हे शब्द बोलायला, लिहायला, वाचायला, ऐकायला किती सरळ अन
सोपे. परंतु, त्या मागे दडलेला अर्थ कोणी
समजून घेत आहे का? मुलांना जर आपण
साक्षात: परमेश्वराची उपमा देत आहोत तर आजच्या युगात भक्तीमध्ये तल्लीन असणारे लोक
या देवरूपी बालकांना किती महत्त्व देतात?
दिवसरात्र देव-देव करणारे लोक या
फुलांना किती जपतात?
घरात काम करणाऱ्या मोलकरणीजवळ
एखाद्या स्त्रीला तिच्या मौल्यवान वस्तू किंवा काही महत्त्वाचे दस्ताऐवज कोणी ठेवायला सांगितले तर ती स्त्री असे कधीच करत
नाही आणि करणार ही नाही कारण; त्या स्त्रीचा त्या मोलकरणीवर विश्वास नसतो. मग तीच स्त्री आपल्या बाळाला, तीच आई आपल्या
जीवाच्या तुकड्याला त्या मोलकरणीच्या विश्वासावर कशी ठेवते? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
KISHORI Y. GHAYWAT
MACJ (PART 1)
No comments:
Post a Comment